पिंपरी : काही वर्षांपूर्वी इथे दिल्लीच्या 'निर्भया'ला बळ देण्यासाठी कँडल मार्च निघाला होता. तो कव्हर करायला आलो होतो. याच हिंजवडी आयटीपार्कमध्ये तेव्हा केवढ्या तरी मेणबत्त्या पेटल्या होत्या.

इथून जवळच गेल्या रविवारी एका देवळाबाहेर दबा धरून बसलेल्या माणसातल्या हैवानानं एकीचा बळी घेतला,अन दुसरीचं बालपण गिळलं. ऊसतोड कामगारांच्या गरीब कुटुंबातल्या या मुली... बाहेरच्या क्रूर समाजाविषयी, भीषणतेविषयी इवलीशी कल्पनाही त्यांना असण्याची शक्यता नव्हती.

या पीडित मुलीला भेटलो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाटलं, ही घटना घडली त्यावेळी देवळातला देव दगड झाला होता का आपल्या समाजव्यवस्थेसारखा?

चेहऱ्यावरचं निरागस बालपण संपलंही नव्हतं तिचं आणि हे ओरखडे उठलेत. त्याबद्दल विचारल्यावर ती सांगायला लागली...

"तेंनी आम्हाला तिकडी नेलत वढित... अन् मला कपडे काढायला लावले. आम्हाला म्हनला खाली झोपा. त्यानं आम्हाला चॉकलेट दिलं."

खूप घाबराला असाल ना तेव्हा?

"हा..." (डोळ्यात साठवलेली कळ ओघळली)

"तो ढकलित व्हता तिला, ती म्हणती मला का ढकलीतो....

तिला लय तरास दिला... "(हुंदका गिळला गेला.)

घरी का सांगितलं नाही?

"............." (मलाच शांतता असह्य झाली.)

काय मागणी कराल? (एव्हाना मुलीचे वडील बोलायला आले होते.)

"गरीबाला कोण हाय वो.... असा अन्याय थांबला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला सांगितल व्हतं, असं करणाऱ्याला शिक्षा देणार, आता द्या फासी म...!"
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours