नांदेड, 30 नोव्हेंबर : आजारी आईचा सांभाळ होत नसल्याच्या तक्रारीवरून मुलानेच आईची हत्या केली आहे. लोहा तालुक्यातील हिपरगा इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाला अटक केली आहे.
पक्षाघाताने 70 वर्षीय शांताबाई कोंडामंगले या गेल्या काही काळापासून अंथरुणावर खिळून होत्या. याच आजारपणाला कंटाळून शांताबाई यांच्या पोटच्या मुलाने गळा चिरून निर्घूण त्यांची हत्या केली आहे. पांडुरंग कोंडामंगले असं या क्रूर मुलाचं नाव आहे.
शांताबाई यांना पक्षाघात झाल्यानंतर त्यांना कोणतीही हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे जेवणापासून इतर सर्व गोष्टींसाठी त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींची गरज भासत असे. आईचा सतत सांभाळ करावा लागत असल्याने पांडुरंग या त्यांच्या मुलाने त्यांची हत्या केली.
वृद्ध आईची मुलानेच गळा चिरून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले. त्यानंतर पोलिसांनी पांडुरंग कोंडामंगले या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, जन्म देणारे आई-वडीलच त्यांच्या आजारपणाच्या काळात नकोशे होत असल्याच्या अनेक घटना अलिकडे सातत्याने समोर येत आहेत. यातून त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण आता तर हत्येच्याही घटना समोर येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours