मुंबई, 29 सप्टेंबर - दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारा सलमानखान नेहमीच चर्चेत असतो. यावेळलाही त्यानं एक मोठी कामगिरी केलीय. स्वतःच्या सुरक्षेला महत्त्व न देता, आपला शेरा नावाचा बॉडीगार्ड त्याने मुंबई दौऱ्यावर आलेला जगविख्यात मुष्टियोद्धा माईक टायसनच्या सुरक्षेसाठी तैनात केलाय. माईक टायसन मुंबईत दाखल होताच त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने घेतली आहे. सलमान खानच्या संमतीनेच आपण टायसनची सुरक्षा करत असल्याचे शेराने न्यूज18 लोकमतला सांगितले. शेरा टायसनला एअरपोर्टवर घ्यायलाही गेला होता.
सलमान खानने माईक टायसनला पार्टीसाठी निमंत्रित केलंय. तू सलमान खानच्या पार्टीला जाणार की आणखी कुठे? त्याबद्दल त्याला प्रश्न विचारला असता, सलमानकडे जाण्याआधी मी मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या मुलांना भेटणार असल्याचं टायसननं सांगितलं. याचं कारण विचारलं असता, मी देखील अशाच कुटुंबातून जन्माला आलोय असं तो म्हणाला. मी सुद्धा स्लमडॉग होतो, मला झोपडपट्टीतून बाहेर पडायचं होतं. त्यामुळे मी संघर्ष केला. त्याचमुळे मी झोपडपट्टीला भेट देणार आहे असंही टायसनने स्पष्ट केलं.
जगविख्यात मुष्टियोद्धा माईक टायसन मुंबई दौऱ्यावर आला आहे. मुंबईत आयोजित मिक्स मार्शल आर्ट लीगचं उद्घाटन टायसनने केलं त्यावेळी त्याने हे विचार बोलून दाखवले. बॉक्सिंग हा खेळ गरीब आणि वंचित मुलांमध्ये जास्त प्रमाणात रुजवण्याची गरज आहे. कारण समाजातील वंचित आणि गरीब मुलांमध्येच संघर्षाची सर्वाधिक ताकद असते असं मत जगविख्यात मुष्टियोद्धा माईक टायसनने व्यक्त केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours