नवी दिल्ली: 'राफेल'वरच्या शरद पवारांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे तारिक अन्वर हे घरवापसीच्या तयारीत असून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केलीय. अन्वर यांच्या निर्णयाचं बिहारमधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वागत केलंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसची उमेदवारीही मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तारिक अन्वर यांनी शरद पवारांसोबतचं 20 वर्षांचं नातं संपवत शुक्रवारी खासदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. 1999 मध्ये त्यांनी विदेशीवंशाच्या प्रश्नावरून शरद पवारांसोबत काँग्रेस पक्ष सोडला होता. शरद पवार, तारिक अन्वर आणि पी.ए.संगमा या तिघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.
त्यामुळं त्यांचं काँग्रेससोबत जुनं नातं आहे. 1976 मध्ये ते बिहार युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. तर बिहारमधल्याच कटिहार या लोकसभा मतदार संघातून ते पाचवेळा खासदारही होते. 1980 मध्ये पहिल्यांदा या मतदार संघातून ते निवडून आले होते.
तारिक अन्वर यांच्या निर्णयाचं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी स्वागत केलंय. ते म्हणाले अन्वर हे अनुभवी नेते आहेत. ते जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा राहिल. ते लोकसभेसाठी उमेदवार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.
तर तारिक अन्वर हे मुळचे काँग्रेसचेच नेते असून, त्यांचा पक्षावर अधिकार आहे असं मत बिहार काँग्रेसचे नेते प्रेमचंद मिश्रा यांनी व्यक्त केलं. त्यामुळ काँग्रेसला बिहारमध्ये चेहेरा मिळण्याची शक्यता आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours