पुणे: पुण्यातील मुळशी येथील तहसीलदार सचिन डोंगरे यांना तब्बल 1 कोटींची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. सचिन डोंगरे यांनी जमिनीच्या व्यवहारातून 1 कोटींच्या लाचेची मागणी केली होती. कोट्यवधी रुपयांची लाच मागण्याची पुण्यातली ही दुसरी घटना आहे.

मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी  तक्रारदार याचं वारस नोंदीचं प्रकरण मंत्रालय येथून फेरचौकशीसाठी तहासीलदार मुळशी यांच्याकडे प्राप्त झालं होतं. यात तक्रारदारला निकालपत्र देणं आणि फेरफार अंती 7/12 पत्रक नोंदी घेण्यासाठी 1 कोटींची लाच मागितली होती.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबद्दल तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.

आज संध्याकाळी  उरवडे गावच्या हद्दीत लवासा रोडवर घोटवडे फाटयाजवळ डोंगरे याने पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. यावेळी, तक्रारदाराकडून 1 कोटींची लाच घेताना एसीबीने डोंगरेंना रंगेहाथ पकडलं, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिली. तक्रारदाराने 1 कोटींची रक्कम असलेल्या बॅगेत 15 लाख रुपयाच्या चलनी नोटा आणि 85 लाख किंमतीच्या चलनी नोटांच्या आकाराचे कोरे कागद ठेवले होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours