मुंबई, 12 मार्च : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या  संभाव्य भाजप प्रवेशानंतर आता राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कारण मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने राधाकृष्ण विखे पाटील हे नैतिकतेचा प्रश्न म्हणून आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश नक्की झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत 12 मार्चला दादरमधील वसंत स्मृती सभागृहात त्यांचा भाजप प्रवेश होईल, अशी माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. पण आता अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशात महत्वाची भूमिका पार पडणारे गिरीश महाजन हेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मुलगा सुजय विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याने राधाकृष्ण विखे पाटलांची चांगलीच अडचण झालेली पाहायला मिळत आहे. कारण काँग्रेसने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासारखी मोठी जबाबदारी दिलेली असताना त्यांचाच मुलगा भाजपमध्ये जात असल्याने मोठी चर्चा रंगत आहे. यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours