नाशिक, 12 मार्च : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपविरोधात आता सर्वपक्षीय विरोधक एकवटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता माकपनेही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्यासाठी आघाडीने त्यांना एक जागा सोडावी, अशी मागणी माकपने केली आहे.
'मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान महासभा यांचं नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात चांगलं काम आहे. त्यामुळे या मतदारसंघातून पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला ही जागा सोडली तर चांगलंच आहे. कारण भाजपला हरवायचं असल्याचं सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,' असं माकपचे आमदार जे. पी. गावीत यांनी म्हटल आहे.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वात राज्यात महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु त्यास अजूनही यश येताना दिसत नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीही जागावाटपाबाबत संतुष्ट नसल्याचंच चित्र आहे.
काय आहे आंबेडकर यांची मागणी?
प्रकाश आंबेडकर यांची पक्षाची गेल्या अनेक दिवसांपासून आघाडीसोबत बोलणी सुरू आहेत. मात्र जागावाटपाबाबत अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यातच प्रकाश आंबेडकरांनी 22 जागांवर आपले उमेदवारही घोषित केलेले आहेत. त्यामुळे आता या 22 जागांवर तोडजोड करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर इतर जागांसाठी आघाडीचा पर्याय खुला असल्याचं म्हटलं आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours