कल्याण, 29 नोव्हेंबर: कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क परिसरात असलेल्या एका चायनीज दुकानात मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट झाला. आगविझवण्यासाठी आलेल्या अग्निशामन दलाच्या जवानाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
मध्यरात्री 1.10 मिनिटांनी मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. स्फोटानंतर आग लागल्याने कल्याण महापालिकेचे अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.
पण आगीचा भडका जास्त असल्याने यात अग्निशमन दलाच्या एका जवानाचा होरपळून मृत्यू झाला आहे. जगन आंबवले असं या मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. पालवे नावाचा एक जवान यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आता आग विझवण्यात आली असून परिसरात धुरीचे लोट पसरले आहेत. तर नेमका सिलेंडरचा स्फोट कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. जगन आंबवले यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर या सगळ्यामुळे परिसरात अजुनही भितीचं वातावरण आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours